हा अभ्यासक्रम पुढच्‍या वर्षापासून बंद

दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र (बी.एड.) अभ्यासक्रम बंद केल्यानंतर आता चार वर्षांचा जुना एकात्मिक बी.ए़ड. अभ्यासक्रमही बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) घेतला आहे.

त्यानुसार २०२४-२५ हे चार वर्षांच्या जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे सत्र असून, २०२५-२६ पासून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही. आता नव्‍या शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा एकात्मिक आयटीईपी अभ्यासक्रम कार्यरत राहणार आहे.

शिक्षक गुणवत्ता, शिक्षक शिक्षणासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेली एनसीटीई ही स्वायत्त संस्था आहे. नव्‍या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरुन एनसीईटीने एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (आयटीईपी) हा चार वर्षांचा एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम सुरू केला आहे.

देशभरातील बहुविद्याशाखीय शिक्षण व्यवस्था असलेल्या ५७ संस्थांमध्ये आयटीईपी बी.एड. एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार आता आणखी शिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक संस्थांना ५ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक सत्र २०२५-२६पासून चार वर्षे मुदतीचा जुना एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम बंद केला जाणार आहे. २०२४-२५ हे त्या अभ्यासक्रमाचे शेवटचे सत्र असेल. चार वर्षांचे एकात्मिक बीएस्सी बीएड, बीए- बीएड अभ्यासक्रम असलेल्या जुन्या संस्थांची मान्यता कायम राहील.