पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं. त्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीची विनंती केल्यानंतर शस्त्रसंधीही झाली. त्यामुळे दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करणं थांबवलं आहे. पण भारताने हल्ले पूर्णपणे थांबवले आहेत का? असा सवाल या निमित्ताने करण्यात येत आहे. त्याला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नाही असं उत्तर दिलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही. ही मोहीम अजून सुरूच आहे. जर पाकिस्तानमधून ऑपरेट होणाऱ्या अतिरेक्यांनी पुन्हा दहशतवादी हल्ले केले तर भारत त्याचं तसंच उत्तर देईल आणि अतिरेक्यांना टार्गेट करेल, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिम मुनीरच्या आर्मीचे दहशतवाद्यांशी थेट संबंध असल्याचं आता उघड झालं आहे. पाकिस्तानी आर्मी दहशतवादामध्ये आकंठ बुडाली आहे. पाक आर्मी आणि दहशतवादी(terrorists)यांना वेगळं करता येणंच शक्य नाही, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांच्या या इशाऱ्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवणार का? असा सवाल केला जात आहे.
एस. जयशंकर म्हणाले की, 1948पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून अशांतता निर्माण केली जात आहे. पाकिस्तानकडून वातावरण खराब केलं जात आहे. त्याच्याशी भारत अजूनही झूंज देत आहे. पाकिस्तानकडून कट्टरपंथी आणि धार्मिक अजेंडाही चालवला जात आहे, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. अतिरेकी पाकिस्तानात फिरत आहेत. आम्हाला त्यांचे अड्डे माहीत आहेत. त्यांनी परत आमच्यावर हल्ला केला तर आम्ही त्यांना घुसून मारू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
सर्वाधिक अतिरेकी पाकिस्तानातच
पाकिस्तानला आपल्या भूमीवर सुरू असलेल्या दहशतवादी(terrorists) कारवायांबाबतची माहिती नाही, अशी एक धारणा तयार करण्यात आली होती. ही धारणाही त्यांनी खोडून काढली. पाकिस्तानी सेना आणि सरकार दोघेही दहशतवादी कारवायांमध्ये आहेत. संयुक्त राष्ट्राने प्रतिबंधित केलेले सर्वाधिक अतिरेकी पाकिस्तानातच आहेत. हे अतिरेकी मोठ्या शहरात राहत असून दिवसळाढवळ्या आपले कारनामे करत आहेत. त्यांचे पते आम्हाला माहीत आहेत. त्यांच्या हालचालींची माहिती आहे. त्यांचे एकमेकांशी असलेले संपर्कही जगजाहीर आहेत, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये लष्कराशी संबंधित दहशतवादी संघटना टीआरएफने केलेल्या हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे सर्व पर्यटक होते. पहलगाममध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी अचानक अतिरेक्यांनी निष्पाप नागरिकांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. भारताने अश्रूंचा बदला म्हणून पाकिस्तानचं पाणी रोखलं होतं. त्यानंतर 7 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील अतिरेक्यांचे अड्डे नेस्तानाबूत केले होते.