रणवीर सिंगने (Ranveer Singh) 6 जुलै रोजी 40 वा वाढदिवस साजरा करतो आहे आणि यादिवशी त्याने चाहत्यांना धमाकेदार गिफ्टही दिले. अभिनेत्याचा आगामी ‘ धुरंधर ‘ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सिनेमाचा पहिला लूक रविवारी त्याच्या वाढदिवशी रीलिज करण्यात आला. पहिल्याच टीजरमध्ये ड्रामा, अॅक्शन, गोळीबार-मारामारी, सस्पेन्स, रोमान्स आणि थ्रिलर पाहायला मिळाला आहे. याशिवाय रणवीरसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची झलक यामध्ये पाहायला मिळाली. सगळ्यांचेच लूक इतके प्रखरपणे दाखवण्यात आले आहेत की, नेमका खलनायक कोण आणि नायक कोण, याचा अंदाज लावणे जरा कठीणच आहे.
‘उरी’ सिनेमा फेम आदित्य धरने ‘धुरंधर’चे दिग्दर्शन केले आहे. ‘धुरंधर’च्या फर्स्ट लूकमध्ये रणवीरसह आर. माधवन, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपालही दिसून आले. याशिवाय एका नवख्या अभिनेत्रीसह रणवीर रोमान्सही करताना दिसला. अभिनेत्री सारा अर्जुन ही भूमिका साकारते आहे. रंजक बाब म्हणजे सारा आणि रणवीर या कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा टीजर शेअर करताना, यापूर्वीच्या सर्व पोस्ट हटवल्या आहेत. या कलाकरांचे इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहिल्यास, ‘धुरंधर’च्या प्रोमोशिवाय तुम्हाला काहीही दिसणार नाही.
‘Uncover the true story of The Unknown Men’, असे कॅप्शन देत ‘धुरंधर’चा प्रोमो शेअर करण्यात आला. रणवीरने या सिनेमासाठी लूकही बदलला आहे. टीजरच्या सुरुवातीला लांब केस, रक्ताने माखलेला चेहरा आणि तोंडात सिगरेट असा लूक अंगावर काटा आणणारा ठरतो. ‘घायल हू, इसलिये घातक हू’, असा त्याचा संवादही लक्ष वेधून घेणारा ठरला.यावर्षी डिसेंबर महिन्यात ‘धुरंधर’ रीलिज होणार आहे. रणवीरच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या रीलिजची तारीख 5 डिसेंबर 2025 आहे.
