‘टिश्यू कल्चर’च्या जोडीने केळी उत्पादनाला उभारी, केळीचा दर्जा उंचावणार

नांदेडच्या केळी उत्पादकांच्या शेतीला ‘टिश्यू कल्चर’ (Tissue Culture) तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होण्यासाठी ५० एकर क्षेत्रात ‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञानाची उभारणी केली जाणार आहे. केंद्रीय पथकाने जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील मौजे खुजडा येथील पन्नास एकर शासकीय गायरान जमिनीवर प्रस्तावित जागेची पाहणी देखील केली. नांदेडसह जालना अणि जळगाव जिल्ह्यात ही टिश्यू कल्चर’ उभारल्या जाण्याची शक्यता आहे. या ‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञान उभारणीमुळे बीज उत्पादन, संरक्षण व संवर्धन सुविधा उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पासाठी केंद्रीय पथकाने नुकताच नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. शासकीय विश्रामगृह बैठक देखील घेतली. नांदेड व परिसरातील आठ जिल्ह्यात केळीचे क्षेत्र, क्षेत्र विस्तार, उत्पादन उत्पादकता आणि निर्यातवाढीच्या संधी, टिश्यू कल्चर रोपांची सद्यस्थितीत उपलब्धता आणि आवश्यकता यातील अंतर भरून काढण्यासाठी सदर प्रकल्पाची नांदेड जिल्ह्यासाठीची उपयुक्तता, प्रस्तावित प्रकल्पाची तांत्रिक अनुकूलता आणि आर्थिक व्यवहार्यता बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सादरीकरणाद्वारे विषद केली.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर,मुदखेड तहसीलदार देऊळगावकर, केळी संशोधन केंद्राचे अधिकारी शिंदे, संचालक शीतलादेवी फार्मर प्रोड्युसर कंपनी, बारडचे निलेश देशमुख, तंत्र अधिकारी श्री स्वामी, कृषी अधिकारी चामे,कृषी अधिकारी हे उपस्थित होते. डॉक्टर जयप्रकाश तम्मिनन यांनी अधिकाऱ्यांसमवेत मौजे खुजडा तालुका मुदखेड येथील प्रस्तावित जागेची भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाची अंतिम जागा निवड लवकरच निश्चित केले जाणार आहे. या टिशू कल्चर प्रकल्पासाठी नांदेड,जालना आणि जळगाव जिल्ह्यातील प्रस्तावित जागांपैकी एकाच जागेची निवड होणार असल्याने या प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्याची निवड व्हावी यासाठी मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे विशेष लक्ष होते.

या प्रकल्पामुळे नांदेडच्या केळीचा दर्जा उंचावेल आणि थेट आंतरराष्ट्रीय बाजाराची दारे खुली होतील. त्यातून केळी निर्यातीचा ‘टक्का’ वाढणार आहे. साहजिकच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील केळीचे क्षेत्र आणि उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. केळीची टिशू कल्चर रोपे कमी दरात उपलब्ध होतील.

टिश्यू कल्चर केळीचे फायदे
रोगमुक्तः नियंत्रित वातावरणात वाढ होत असल्याने संसर्गाची बाधा होत नाही. सर्व झाडे समान गुणधर्माने वाढत असल्याने समान फळांचे उत्पादन होते.शिवाय झाडे लवकर परिपक्व होत असल्याने उत्पादकाला फायदा होणार आहे.