चक्रीवादळसदृश्य वारे तुमच्यापासून किती दूर? पाहा सविस्तर हवामान वृत्त

साधारण आठवडाभरापासून मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकणासह पश्चिम महाराष्ट्रावर पावसाळी ढगांचं अच्छादन पाहायला मिळालं. एकिकडे कोकण किनारपट्टी भागाला हवामान(weather) विभागानं वादळाचा इशारा दिलेला असतानाच मुंबईत मात्र या इशाऱ्यानं चकवा दिला. पावसाळी ढगांची दाटी झाल्यामुळं आकाश ढगाळच होतं, ज्यामुळं प्रखर सूर्यप्रकाश नसला तरीही शहरातील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. पुढील 24 तासांसाठीसुद्धा मुंबईत पावसाचा इशारा असला हा पाऊस नेमका कुठं दडी मारून बसलाय हेच अनेकांना कळेना.

दरम्यान ऊन आणि पाऊस अशा द्विधा परिस्थितीमध्ये मुंबईकर त्रस्त असतानाच तिथं अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुढच्या 24 तासांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांना हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भात अवकाळीचा तडाखा काही भागांमध्ये नागरिकांचा गोंधळ उडवू शकतो असंही हवामान(weather) विभागानं स्पष्ट केलं आहे.

पुढचे चार-पाच दिवस पावसाची रिपरिप
अरबी समुद्राच्या पूर्व- मध्य क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं कोकण किनारपट्टीवर कमी दाब क्षेत्र तयार होत असून, ते अधिक तीव्र होताना दिसत आहे. त्यातच वाऱ्यानं चक्राकार गती धारण करत चक्रीवादळसदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसत असल्या कारणानं दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे किमान चार ते पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात काही किनारपट्टी गावांना वादळी पावसाचा तडाढा बसून वादळी वाऱ्यांचा माराही सहन करावा लागेल असा इशारा जारी करण्यात आला आहे.

मान्सून येतोय…48 तासात हजर
नैऋत्य मोसमी वारे अर्था मान्सूनसाठी पूरक असणारी स्थिती निर्माण झाल्यानं पुढच्या 48 तासांनंतर देशाच्या दक्षिणेकडून मान्सूनचं आगमन होणं अपेक्षित आहे. एकंदर वाऱ्याची स्थिती पाहता अरबी समुद्र दक्षिण भागासह, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भाग, तामिळनाडू आणि दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागापर्यंत मान्सूनचे वारे मजल मारण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. ही एकंदर प्रणाली पाहता पुन्हा एकदा यंदाच्या वर्षी मान्सून निर्धारित तारखेच्या आधीच धडकणार असं म्हणणं गैर ठरणार नाही. मागील दोन दिवस हे मोसमी वारे श्रीलंकेच्या क्षेत्रात रेंगाळल्यानंतर पुन्हा एकदा या वाऱ्यांचा प्रवास सकारात्मक वेगानं सुरू होईल, ही दिलासादायक माहिती.