सांगली-पेठ महामार्गावर रम्बलर, स्पीडगन बसवा; आमदार जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी

पेठ-सांगली महामार्गावर शहरे, दाट वस्ती असलेल्या भागात छोटे उंचवटे (रम्बलर) व स्पीड गन बसवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली.

जयंत पाटील म्हणाले, ”केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने पेठ नका ते सांगली राष्ट्रीय महामार्ग अतिशय चांगला केला. परिणामी वेग वाढला आहे.

त्यामुळे शहर आणि वस्ती असलेल्या भागात, जसे – ईश्वरपूर, आष्टा, कारंदवाडी, कसबेडिग्रज अशा भागात रम्बलर लावण्यात यावे. स्पीड गन बसविण्यात याव्यात. याबाबत मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले आहे.”

दरम्यान, यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. याबाबतच्या आराखड्याप्रमाणे सुधारणा करून घेतल्या जातील.

आराखड्याला तातडीने मान्यता मिळेल. अपघातावर नियंत्रण ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या काळात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.