संपूर्ण प्लास्टिक बंदी होणे काळाची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आजच बोलणार आहे. त्यानुसार लवकरच राज्यात संपूर्ण प्लास्टिक (plastic) बंदीबाबतचा निर्णय घेऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.
पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती प्रयोगशाळेत देवी लसीचे उत्पादन सुरू करणे, राष्ट्रीय संदर्भ लस चाचणी प्रयोगशाळा, जैवसुरक्षा पातळी दोन आणि तीन प्रयोगशाळा, सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘पावसाळ्यात कुठेही काहीही तुंबले, की त्याला प्लास्टिक कारणीभूत ठरते. त्यामुळे प्लास्टिकबंदी ही काळाची गरज आहे. मी स्वत: प्लास्टिकबंदीसाठी आग्रही आहे. आज पुण्याहून विमानातून मुंबईला जातानाच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी याबाबत बोलणार असून, लवकरच राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदीसाठीचा निर्णय घेऊ.’
अनेक गायींच्या पोटात प्लास्टिक सापडत असल्याने त्यांच्या दुधापासून बाळांना आजार होत आहेत. याबाबत जनजागृती होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनापासून पशुसंवर्धन खात्यात ‘नो से नो प्लास्टिक’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
‘पशुसंवर्धन व्यवसायाला कृषीचा समकक्ष दर्जा देण्यासाठीची फाइल वित्त व नियोजन विभागाकडे प्रलंबित आहे. मंगळवारी (२७ मे) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतची शिफारस केली जाईल,’ अशी ग्वाही पवारांनी दिली.