जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद! पर्यटकांना करावी लागणार उद्यापासून ४ महिने प्रतीक्षा

विद्यार्थ्याच्या वार्षिक परीक्षा झाल्यानंतर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची सफर घडवत असतात.. तसेच इतर पर्यटकांची पाऊलं गडकिल्ल्यांकडे वळली आहेत. मात्र आता पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुरुड जंजिरा (Janjira) किल्ला उद्यापासून (दिनांक २६मे) चार महिन्यासाठी बंद होणार असल्याने पर्यटक यांचा हिरमोड होणार आहे.

पावसाळा जवळ आल्याने ढगाळ वातावरणासोबत समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये, यासाठी उद्या(सोमवार दिनांक २६मे २०२५)पासून पुरातत्व खात्याने जंजिरा किल्ला बंद करण्याची घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी प्रवेश द्वाराजवळ उतरताना प्रवाशांची होणारी कसरत लक्षात घेता सुरक्षिततेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना, अलिबाग- मुरुडचे पुरातत्व विभाग अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली आहे. पावसाळ्यात समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटा, वादळ, हेलकावे यामुळे होऊ शकणारी दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मेरिटाइम बोर्ड दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षितता म्हणून राजपुरी खाडीतील जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवत असतात.

मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी गर्दी होते. त्यातच पावसाळाजवळ आल्याने लाटांचा प्रवाह वाढला आहे. शिडाच्या बोटी हेलकावे घेत असल्याने किल्ल्याच्या तटावर उतरणे जिकरीचे होते. परंतु, थोड्या संयमाने पर्यटकांना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ उतरावे लागते. त्यासाठी नूतन जेट्टी बांधण्यात आली आहे. परंतु, ती पावसाळ्यानंतरच सुरु होणार आहे.

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी ५ लाखांपेक्षा अधिक राज्यसाहित देश विदेशातील पर्यटक येत असतात. पर्यटकांमुळेच येथील बोटचालक, लॉन्च मालकांचा उदरनिर्वाह होत असतो. मुरुड जंजिरा किल्ला हा जलदुर्ग आहे. स्थापत्यकलेचा अत्यंत उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ला पाहण्यासाठी अनेकजण येत असतात. अरबी समुद्रामध्ये असलेला हा जलदुर्ग असल्यामुळे पर्यटकांची संख्या मोठी असते. आणि किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी समुद्रातून नावेने जावे लागते. सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊसधारा कोसळत आहेत. त्यामुळे पर्यटन विभागाने मुरुड जंजिरा किल्ला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.