इचलकरंजी येथील संजय गांधी निराधार समिती बरखास्त

 
येथील संजय गांधी निराधार योजना समिती रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केला आहे. त्यामुळे आता नव्याने समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून इच्छुकांकडून आपापल्या परीने फिल्डींग लावण्यास सुरूवात झाली आहे. 

संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्ष आणि अशासकीय सदस्यांची नेमणूक ही पालकमंत्री यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यामार्फत केली जाते. सन २०२३ साली जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ असताना संगायो समिती गठीत करण्यात आली होती.राज्यातील राकीजय समीकरणानुसार येथील समितीमध्ये आवाडे गटाचे तीन, हाळवणकर गटाचे तीन तर शिवसेना शिंदे गटाचे चार सदस्यांचा समावेश होता.तर अध्यक्ष म्हणून अॅड. अनिल डाळ्या कामकाज पाहत होते. तसेच शासकीय सदस्य तत्कालीन नगरपालिका अधिकारी, गट अधिकारी, तर सचिव म्हणून अप्पर तहसिलदार हे काम पाहत होते.

मात्र, राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संजय गांधी निराधार समिती रद्द करण्याचे आदेश २२ मे २०२५ रोजी जारी केले आहेत. त्यामुळे जुनी संजय गांधी निराधार समिती रद्द होऊन नव्याने समितीची निवड केली जाणार आहे. राज्यात भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट असे मिळून महायुती आहे. त्यामुळे नव्याने समितीमध्ये घटक पक्षांना संधी द्यावी लागणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर हे कामकाज पाहत आहेत. तेव्हा नव्याने गठीत होणाऱ्या समितीमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी आतापासूनच हालचाली गतिमान केल्या आहेत.