इचलकरंजीत मंगळवारपासून मराठी दिन महोत्सवाचे आयोजन

 इचलकरंजी येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन – मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवार ता. २५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या काळात मराठी दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नाट्यकलेची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर मराठी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी याकरिता या उपक्रमात मंगळवार ता. २५ रोजी ‘ बालनाट्य उत्सव’ आयोजित केला आहे. यामध्ये विविध ठिकाणच्या स्पर्धेमध्ये यश मिळविणारी तीन बालनाट्ये सादर करण्यात येणार आहेत.

बुधवार ता. २६ रोजी रात्री ९.१५ वाजता ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ हे नाटक सादर होणार आहे. गुरुवार ता. २७ रोजी रात्री ९.१५ वाजता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मराठी भाषेची वाटचाल दाखविणारा, श्रवणीय गीतांवरील समुह नृत्ये आणि गीत संगीताचा ‘इये मराठीची नगरी’ हा सुरेल कार्यक्रम होणार आहे. समारोपाच्या दिवशी शुक्रवार ता. २८ रोजी रात्री ९.१५ वाजता दोन एकांकिका सादर होणार आहेत. यामध्ये गायन समाज देवल क्लब कोल्हापूर प्रस्तुत ‘अलमोस्ट डेड’ आणि फोर्थ वॉल थिएटर इचलकरंजी प्रस्तुत ‘लॉटरी’ या एकांकिका आहेत. सदरचे सर्व कार्यक्रम येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार असून सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. नाट्य रसिकांनी मित्र परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.