महाबळेश्वरच्या पायथ्याला नवीन महाबळेश्वर वसवण्याचे काम सध्या सुरू आहे. एमएमआरडीए कडून या नवीन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी व पाटण तालुक्यातील गावांसाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एमएमआरडीएकडून नवीन महाबळेश्वरच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. यात आधी 235 तर आता 294 गावे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.
या भागात असलेल्या औषधी वनस्पती पाहता डाबर, पतंजलीसारख्या कंपन्यांना आमंत्रित करावे, तसेच वेलनेस सेंटर, निसर्गोपचार केंद्र याना प्रोत्साहन द्यावे. नव्याने धबधबे, इको फ्रेंडली रस्ते विकसित करून येथील नागरिकांना इथेच रोजगार मिळू शकेल यासाठी प्रयत्न करावेत असे उपमुख्यमंत्र्यांनी सुचवले. तसेच याठिकाणी तापोळा येथील उत्तेश्वराच्या मंदिराचे काम, उत्तेश्वर रोप वेचे काम याचीही प्रगती जाणून घेतली. तसेच या कामांची गती वाढवण्यास सांगितले.
एमएसआरडीसीला शासनाने अनेक प्रकल्प शासनाने दिले असून ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, तसेच सिडको, एमएमआरडीएप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी व्हावे असे सांगितले. एमएसआरडीसीची कामे ज्याठिकाणी सुरू आहेत तिथे राडारोडा दूर करून बेरिकेड्स बसवावेत. पुलाखाली उत्तम झाडे लावून सुशोभीकरण करावे. तसेच पावसाळ्यापूर्वी करायच्या कामांना प्राधान्य देऊन ती सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश शिंदे यांनी या बैठकीत दिले.
नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा जिल्ह्यातील 101 गावे, 193 पाटण आणि 49 जावळीची गावे आहेत. तसंच, या गावांचे एकूण क्षेत्र 1,15,300 हेक्टर इतके आहे हा परिसर सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. या भागातून सोळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात. यामुळे हा परिसर हिरवागार आणि नयनरम्य आहे. त्याचबरोबर घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देणगी लाभली आहे. परिणामी गिरीस्थान म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने तो परिपूर्ण आहे.