नदीचं पाणी शहरात घुसलं, रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस

कोकणातील रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खेड आणि नागोठणे या शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून आता नदीचे पाणी मार्केट परिसरात शिरले आहे. अशातच संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचा (Raigad Rain) जोर अजूनही कायम आहे. हवामान खात्यानेही रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे रायगडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

खेडमध्ये जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केटमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुख्य मार्केटमध्येही पावसाचे पाणी शिरु शकते. या परिस्थितीवर स्थानिक प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. खेड नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी या दोन नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे खेड शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, घाटमाथ्याच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागोठणे शहरात रस्ते जलमय झाले आहेत. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. पुढील काही तास असाच पाऊस सुरु राहिल्यास नागोठणे शहरातील घरं पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनाने नागोठणे परिसरात रस्त्यावर बोटी उतरवल्या आहेत.

हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे आज प्रशासनाकडून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, नागोठणे येथील आंबा नदीने इशारा पातळीच्या वर वाहत आहे. जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज ठेवले आहे.