७२ वी मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धा भारतात हैदराबादमध्ये भव्य दिव्यरित्या आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत यावर्षी थायलंडची ओपल सुचाता चुआंग्सरी हिने मिस वर्ल्डचा मुकुट आपल्या शिरपेचात धारण करण्यात यश मिळवले. हा क्षण ऐतिहासिक ठरला आहे. तर दुसरीकडे इथिओपियाची हसेट डेरेजे अदमसू ही या सौंदर्यवती स्पर्धेची पहिली उपविजेती ठरली. भारताच्या नंदिनी गुप्ता हिला टॉप ८ मधून बाहेर पडावे लागले. अशा परिस्थितीत, आता सर्वांना मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओपलने कोणत्या प्रश्नाचे काय उत्तर देऊन मिस वर्ल्डचा किताब मिळावला हे जाणून घ्यायचे आहे.
यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत अभिनेता सोनू सूदने ओपल सुचाता हिला विचारले की, ‘मिस वर्ल्डच्या या प्रवासाने तुम्हाला सत्य आणि वैयक्तिक जबाबदारीबद्दल काय शिकवले, ते कथांना कसे आकार देते?’ अभिनेत्याच्या या प्रश्नाचे उत्तर ओपलने पूर्ण आत्मविश्वासाने आणि शांततेने दिले. ओपल म्हणाली, ‘मिस वर्ल्डमध्ये असणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी आहे. या प्रवासात मी गोष्टींकडे कसे पाहायचे ते शिकले.
ओपल पुढे म्हणाली, ‘मला वाटते की आपण येथे सर्वात मोठी गोष्ट करू शकतो ती म्हणजे सर्व लोकांसाठी प्रेरणा बनणे, मग ते मुलं असोत, प्रौढ असोत किंवा आपले पालक असोत. कोणतीही व्यक्ती, त्यांचे वय कितीही असो किंवा त्यांना कोणताही पदवी मिळाली असो, त्यांना त्यांच्याभोवती एक अशी व्यक्ती आढळते जी त्यांच्याकडून प्रेरणा घेते असते.’ ती म्हणाली, ‘लोकांचे नेतृत्व करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या कामाद्वारे आपली सभ्यता राखणे. आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी आपण करू शकणारी ही सर्वात मोठी गोष्ट आहे.’
ओपलेच्या या उत्तराने आणि तिच्या आत्मविश्वासाने सोनू सूद सोबतच इतरही परीक्षक प्रभावित झाले. यंदाच्या स्पर्धेत राणा दग्गुबाती, मानुषी छिल्लर, आणि शिल्पा शिरोडकर हे देखील परीक्षक म्हणून होते. ओपलचे कौतुक करताना सोनू सुद म्हणाला की, खूपच सुंदर उत्तर, तुम्ही खरोखरंच सौंदर्य आणि बुद्धीमत्तेचे एकत्रित उत्तम उदाहरण आहे.