राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी आपल्या पदाचा 14 मे रोजी राजीनामा दिला होता. समाज कंटकाकडून आपली राजकीय बदनामी केली जात असल्याचं म्हणत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक कटकारस्थान करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता. दीपक मानकर यांनी दिलेल्या राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी पक्षातील दोन नेत्यांना संधी दिली आहे. आमदार सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नवीन शहराध्यक्ष असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आता पुणे शहराला दोन शहराध्यक्ष निवडले आहेत. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे पूर्व पुणे शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवीन शहराध्यक्षाची घोषणा होण्यापूर्वी अनेक नावांची चर्चा सुरू होती. सुरुवातीला या रिक्त झालेल्या शहराध्यक्ष पदासाठी आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांची नावे चर्चेत होती. आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतःला शहराध्यक्ष पदापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात होतं. तर शहराध्यक्षपदाच्या रेसमध्ये माजी महापौर दत्ता धनकवडे आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीकडून माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे पूर्व पुणे शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुभाष जगताप यांच्याकडे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कादगपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष राहिलेल्या शंतनू कुकडेला पुणे पोलीसांनी बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने आणि मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलीसांनी शंतनू कुकडे याच्या बँक खात्यांची पडताळणी केली. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते. दरम्यान बनावट कागदपत्र फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक मानकर यांच्याकडून पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्यात आला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये माझ्या राजकीय आलेख पाहता आणि पक्षाची मजबूत स्थिती पाहता बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने राजीनामा दिल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा पत्रात करण्यात आला आहे.