खरिपाच्या (Kharif) हंगामात विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसमोर अनेक प्रकारच्या कीटकांचा धोका निर्माण होतो, आणि यावर्षीही वेगळं चित्र नाही. अनेक भागांमध्ये पावसाची सुरुवात होताच शेतकरी खरीप पेरणीला लागले आहेत. अशा वेळी जमिनीत ओलावा तयार झाल्यामुळे काही कीटक सक्रिय होतात आणि नव्याने उगवलेल्या पिकांवर हल्ला करतात. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः सिंचन क्षेत्रात कपाशी पिकावर “वाणी” किंवा “पैसा” म्हणून ओळखली जाणारी मिलीपिड ही कीड आढळून येत आहे. ही कीड काही वेळा दुर्लक्षित केली जाते, पण ती नव्याने अंकुरलेल्या, कोवळ्या रोपांसाठी अत्यंत घातक ठरते. रोपांची वाढ खुंटवणे, पाने कुरतडणे आणि काही वेळा संपूर्ण झाड सुकवणे अशी या कीडीची लक्षणं दिसून येतात.
या कीडीचा प्रादुर्भाव विशेषतः अशा शेतांमध्ये जास्त दिसून येतो जिथे शेतकऱ्यांनी पावसाच्या सुरुवातीला किंवा सिंचनाच्या सहाय्याने पेरणी केली आहे. सध्या काही भागांत पाऊस असला तरी तो सर्वत्र झाला नसल्यामुळे अनेक शेतांमध्ये पेरणीचे प्रमाण कमी किंवा विस्कळीत आहे. मात्र जिथे पेरणी झालेली आहे, तिथे कपाशीसारख्या पिकांमध्ये दोन ते तीन पानांची अवस्था आलेल्या रोपांवर ही कीड आक्रमण करत आहे. वाणी ही कीड जमिनीत असते, ती लांबट, काळसर, अनेक पायांची आणि संथ गतीने हालचाल करणारी असते. पावसामुळे जमिनीत ओलसर वातावरण तयार झाल्यास ती जमिनीवर येते आणि रोपांचे कोवळे भाग कुरतडून खाते. परिणामी, रोपांचे शेंडे खराब होतात, पाने फाटतात आणि वाढ खुंटते. याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. गेल्या वर्षीही ही कीड सोयाबीन, तूर, मूग यांसारख्या पिकांमध्ये दिसून आली होती.
वाणी कीडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही प्रतिबंधात्मक उपाय तात्काळ अवलंबले पाहिजेत. सर्वप्रथम पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. बीजप्रक्रियेमुळे उगवलेल्या रोपांची प्रतिकारशक्ती वाढते आणि काही प्रमाणात कीड प्रतिबंध करता येतो. जमिनीत जास्त वेळ पाणी साचू नये यासाठी योग्य निचरा यंत्रणा ठेवणे गरजेचे आहे. शेतामध्ये काडी-कचरा, गवत, पालापाचोळा यांचे ढीग तयार होऊ देऊ नयेत, कारण ही ठिकाणं वाणी कीडीच्या लपण्याच्या जागा बनतात. काही शेतकरी रात्री गवताचे ढीग करून त्यात वाणी जमा करतात आणि सकाळी ती मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करतात. हा एक पारंपरिक व उपयोगी उपाय आहे.
त्याचबरोबर जमिनीत वेळेवर कोळपणी करणे, मशागत करत राहणे, शेत स्वच्छ ठेवणे हे अत्यंत फायदेशीर उपाय आहेत. वाणी कीड जमीन उकरल्यावर वर येते आणि यामुळे तिच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. काही शेतकरी ट्रायकोडर्मा, बॅसिलस, सुडोमोनास यांसारखे जैविक घटक जमिनीत मिसळतात, जे जमिनीतील हानिकारक कीटक आणि बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवतात. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते आणि पीक निरोगी राहते.