सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री स्पेशल पॅकेज जाहीर करणार, मंत्री गोरेंची माहिती

सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याचबरोबर घरांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. या पूरग्रस्तांना सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी केली जातेय. याच मुद्द्यावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्पेशल पॅकेज जाहीर करणार आहेत. सध्या पूरग्रस्तांच्या शेतीचे व घराचे पंचनामे सुरु असून तातडीची मदत देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. यामुळं नदी नाले, धरणे तुडुंब भरली होती. यामुळं मोठ्या प्रमाणात सीना नदीत पाण्यातचा विसर्ग आला होता. त्यामुळं सीना नदीला महापूर आला. यामुळं शेती पिकांचं, घरांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. तर काही जणांची वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. याबाबत बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्पेशल पॅकेज जाहीर करणार आहेत. त्यामुळं आता मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करणार? शेतकऱ्यांना किती फायदा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.