पेट्रोल पंप घोटाळा ,दिघंचीत भीक मांगो आंदोलन

आटपाडी , मार्केट कमिटीच्या दिघंची येथील पेट्रोल पंपावर मोठा घोटाळा झाला असून त्याच्या सविस्तर चौकशीसाठी बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकमार्गे मुख्य पेठेतून दिघंची येथे भीक मांगो आंदोलन केले. यामध्ये व्यापारी व आठवडी बाजाराला रविवारी बाहेरगावाहून येणाऱ्या गावकर्यांकडूनही प्रत्येकी रुपया गोळा केला. भीक मागून जमा झालेले दोनशे रुपये आटपाडी तालुक्याचे नायब तहसीलदारांना भेट म्हणून देण्यात आले.

यावेळी डॉ. उन्मेश देशमुख म्हणाले, मार्केट कमिटी , तालुका उपनिबंधक यांना ९ जूनला निवेदन दिले. सर्वच संचालकांचे राजीनामे घेऊनच शासकीय ऑडिट करा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिघंची येथील पेट्रोल पंपावर मार्च,एप्रिल व मे महिन्यात १८ लाख ४५ हजार रुपयेचा भ्रष्टाचार झाला. संचालक मंडळाला बाजूला करून ऑडिट करा. संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून पेट्रोल पंपावरील भ्रष्टाचाराची नि;पक्ष चौकशी करा. सभापतीसह सर्वच संचालक, सचिव यांनी मिळूनच हा भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत,अशी आमची मागणी आहे. मार्केट कमिटी संचालकांचे राजीनामे घेतले नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही तर कृषी उत्पन्न बाजार समितीसह तालुका व जिल्हा उपनिबंधक कार्यकल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यावेळी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव,विलास देशमुख, अशोक गायकवाड , आटपाडी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड खानापूर विधानसभा क्षेत्राध्यक्ष दिलीप काटकर, संजय ढोक , आकाराम पवार ,महादेव लोखंडे,महादेव काटकर ,शंकर जगताप, शिवनेरी ग्रुपचे धनंजय जावीर , दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब औंधकर उपस्थित होते.