गिलच्या ‘कॅप्टन’ इनिंगने टीम इंडियाची पहिल्या दिवशी त्रिशतकी मजल; यशस्वी जयस्वालची 87 धावांची खेळी

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय संघाच्या नावावर राहिला. इंग्लंडविरुद्ध बुधवारी झालेल्या खेळाच्या अखेरीस टीम इंडियाने 5 विकेट गमावून 310 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 114 आणि रवींद्र जडेजा 41 धावा काढून नाबाद परतला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 99 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 87 धावा काढून बाद झाला. करुण नायरने 31 आणि ऋषभ पंतने 25 धावांचे योगदान दिले. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात 98 धावांवर 2 विकेट गमावल्यानंतर, चहापानापर्यंत भारतीय संघाने चांगले पुनरागमन केले. येथे भारतीय संघाची धावसंख्या 183/3 होती. परंतु, तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला संघाने सलग दोन षटकांत ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी यांची विकटे गमावली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने पहिल्या सत्रातच केएल राहुलची विकेट गमावली. त्याला ख्रिस वोक्सने फक्त 2 धावा काढल्यानंतर बोल्ड केले. त्यानंतर, यशस्वी जयस्वालने पुन्हा करुण नायरसोबत 80 धावांची भागीदारी केली. करुण ३१ धावा काढून बाद झाला. यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) जोश टँगच्या षटकात सलग 3 चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या कसोटीत शतक केल्यानंतर, त्याने दुसऱ्या कसोटीत अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या सत्रात 87 धावा काढून यशस्वी बाद झाला. तथापि, या सत्रात शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भारतासाठी आणखी एकही विकेट पडू दिली नाही.

तिसऱ्या सत्रात शुभमन गिलने आपले 8 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. तथापि, त्याच्यासमोर ऋषभ पंत 25 धावा काढून आणि नितीश कुमार रेड्डी केवळ 1 धावा काढून बाद झाले. 7व्या क्रमांकावर आलेल्या रवींद्र जडेजाने डावाची सूत्रे हाती घेतली आणि शुभमनसोबत 99 धावांची भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोघांनीही भारतासाठी आणखी एकही विकेट पडू दिली नाही.