छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षपूर्ती निमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक पाच, सहा व सात जानेवारीला महानाट्याचे आयोजन शहरातील गांधी मैदान येथे केले जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी तीन प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होणार आहे. हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील झालेल्या बैठकीत विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अशासकीय सदस्यांची समिती गठित केली आहे.
किमान दहा हजार शिवप्रेमींसाठी या महानाट्याचे नियोजन केले जाणार आहे. हे महानाट्य पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
शिवगर्जना हे महानाट्य कोल्हापुरातील भूमिपुत्रांचे असून आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही हे महानाट्य सादर झाले आहे.
या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक अतिशबाजी ही असणार आहे.