शुगरमिलच्या मार्गावर टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा मजकूर लिहिल्याने कसबा बावड्यात तणाव निर्माण झाला. हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन भगवा चौकात संताप व्यक्त केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तासाभरात तणाव निवळला.
दरम्यान, संबंधित समाजकंटकावर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. नवरात्रोत्सवानिमित्त बावड्यात दरवर्षी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते. दौडचा काल दुसरा दिवस असल्याने कार्यकर्ते पहाटे शुगरमिलच्या दिशेने गेले होते. त्याच मार्गावर ऑईल स्प्रेने ‘भारत का बादशाह टिपू सुलतान,’ असा मजकूर लिहिला होता.
अंधार असल्याने तो कार्यकर्त्यांना दिसला नाही. पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ तेथे धाव घेत मजकूर पुसला. त्याची कुणकुण हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांना लागताच त्यांनी सकाळी नऊ वाजता भगवा चौकात धाव घेतली. त्यांनी बावडा बंदची हाक देण्याचा निर्धार करत निषेध फेरी काढण्याचा आग्रह धरला. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. संबंधित समाजकंटकाचा शोध घेण्याची मागणी केली.
शहर पोलिस उपाधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी नवरात्रोत्सवात करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून भाविक कोल्हापुरात येत असल्याने, त्यांना त्रास होणार नाही, अशी भूमिका घेतली. काही वेळानंतर त्यांनी बावडा बंद व निषेध फेरी काढली जाणार नाही, असा निर्णय घेतला. त्यानंतर करवीर पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी श्री. टिके यांच्याशी चर्चा केली. यावेळी सुरेश उलपे, सरदार पाटील, ॲड. अजित पाटील, शिवराज जाधव, अक्षय खोत उपस्थित होते.
‘टार्गेट’ करण्याचे कारण काय?
कसबा बावड्यात यापूर्वी अशी घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा सामाजिक तेढ वाढविण्याचा प्रकार आज घडला. पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे संबंधिताचा शोध घ्यावा, अशी मागणी करत बावड्याला ‘टार्गेट’ करण्याचे कारण काय, अशी विचारणा ज्येष्ठ कार्यकर्ते मानसिंग जाधव यांनी टिके यांना केली.
अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संजय रामचंद्र जासूद (कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात ही फिर्याद दिली. तसेच दोन्ही समाजातील मान्यवरांना, प्रतिष्ठांना बोलावून करवीर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात शांतता बैठका घेण्यात आल्या.