आज आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महायुतींच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करतेवेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.
यावेळी महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक देखील उपस्थित होते. गांधी मैदान, महाद्वार रोड, शिवाजी चौक, सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप या महामार्गावर महायुतीची रॅली काढण्यात आली.