जिल्हा अधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज कडे जाणाऱ्या मार्गावर कारमधून १ कोटी ९८ लाख ९९ हजार ५०० रूपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.आण्णा सुभाष खडतरे आणि किरण हणमंत पवार अशी दोघांची नावे आहेत. एवढी मोठी रक्कम कोणाची आहे? आणि ती कुठून आणली? याचा शोध पोलिसांसह इन्कम टॅक्स विभागाकडून सुरू आहे. नागाळा पार्क परिसरात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रात्रगस्त सुरू होती. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज मार्गावर पाटलाचा वाडा हॉटेलच्या मागे अंधारात थांबलेली कार गस्त घालणाऱ्या पोलिसांना दिसली.
कारजवळ जाऊन चौकशी करताच कारमधील दोघांनी उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांना टाळण्याचा प्रयत्न केला. संशय बळावताच पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला. त्यावेळी पुढील सीटखाली आणि पायात नोटांचे बंडल आढळले. मोठ्या रकमेबद्दल योग्य पुरावे आणि माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेऊन रक्कम जप्त केली. आयकर विभागाचे निरीक्षक अमोल पंढरपूरकर आणि विनयकुमार दुबे यांच्या उपस्थितीत इनकॅमेरा रक्कम जप्तीची प्रक्रिया करण्यात आली. पोलीस निरीक्षक डोके यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे, उपनिरीक्षक संजीव बबरगेकर, हवालदार तानाजी चौगले, दयानंद पाटील, चंद्रशेखर बाटुंगे, दिगंबर कुंभार, रत्नदीप जाधव, ऋतुजा सावंत यांनी ही कारवाई केली.
