जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळांमध्ये बिंदुनामावलीनुसार शिक्षकांची ६२० पदे रिक्त आहेत. पण, ३० टक्के पदे रिक्त ठेवली जाणार असल्याने आणि आंतरजिल्हा बदलीतून स्वजिल्ह्यात आलेल्या शिक्षकांमुळे नवीन शिक्षक भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदेला केवळ ४०९ शिक्षक मिळणार आहेत.
८ जानेवारीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.एक वर्षांपूर्वी जाहीर झालेली जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक भरती अजूनपर्यंत संपलेली नाही. भावी शिक्षकांनी ‘पवित्र’वर नोंदणी करून आता चार महिने होत असून ‘टेट’ परीक्षेलाही सहा महिने होऊन गेले.
तरीदेखील नोंदणीशिवाय काहीही कार्यवाही झालेली नाही. सोलापूरसह राज्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करून घेतली. त्यानंतर काही जात संवर्गांसाठी जागा कमी किंवा त्या संवर्गातील पदेच रिक्त नसल्याचा आक्षेप नागपूरच्या अधिवेशनात घेण्यात आला. त्यामुळे आता एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्केच पदभरतीचा निर्णय झाला.१० टक्के पदे बिंदुनामावलीवरील आक्षेपांची पूर्तता झाल्यावर भरायची आहेत.
आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून ८२ शिक्षक आले आहेत. तर सोलापूर जिल्हा परिषदेकडील ३१ शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीतून सोलापूर जिल्हा परिषदेला ५१ शिक्षक मिळाले आहेत. त्यांना आता काही दिवसांत नेमणूक दिली जाईल. पण, एकूण रिक्त शिक्षकांपैकी आंतरजिल्हा बदलीतील ५१ आणि ५८४ रिक्त पदांमधील ७० टक्के (४०९) पदे आता भरली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता सेवानिवृत्तीपर्यंत एकाच जिल्ह्यात नोकरीग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा नुकताच ऑनलाइन पद्धतीने पार पडला. आता नवीन शिक्षक भरती करताना उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जातील. ही प्रक्रिया साधारणत: १५ जानेवारीनंतर सुरू होईल. प्राधान्यक्रम भरताना ज्या जिल्ह्यात नोकरी हवीय व ज्या शाळांमध्ये नोकरी पाहिजे, त्याची माहिती भरावी लागणार आहे. त्यासाठी कोणतीही मर्यादा नसणार आहे.
पण, नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात नोकरीसाठी जाता येणार नाही. त्यांच्यासाठी आंतरजिल्हा बदलीचा पर्याय कायमचा बंद राहणार आहे.आचारसंहितेपूर्वी भरती पूर्ण करण्याचे नियोजनलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकते, असे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी, भावी शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरून घेणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना नेमणुका देण्याची प्रक्रिया २९ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून सुरू असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.