भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. यानिमित्ताने त्यांनी फ्रान्समध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली.
2030 सालापर्यंत फ्रान्समध्ये 30 हजार भारतीय विद्यार्थी असतील यादृष्टीने एक योजना आखल्याचं त्यांनी जाहीर केलं.पब्लिक स्कूलमध्ये फ्रेंच भाषा शिकता यावी यासाठी “फ्रेंच टू ऑल, फ्रेंच फॉर अ बेटर फ्युचर” या अभियानाअंतर्गत मोहीम राबवण्यात येईल.
जास्तीत जास्त फ्रेंच लर्निंग सेंटर्स उभारण्यासाठी एक नेटवर्क तयार केलं जात असल्याची माहिती देखील इमॅन्युएल यांनी दिली.फ्रान्समध्ये शिक्षण घ्यायचं आहे, मात्र फ्रेंच येत नाही अशा विद्यार्थ्यांनाही तिथे जाता येणार आहे. यासाठी फ्रान्स सरकार आपल्या विद्यापीठांमध्ये विशेष ‘इंटरनॅशनल क्लासेस’ सुरू करण्यात येणार आहेत असं इमॅन्युएल यांनी स्पष्ट केलं.
फ्रान्समध्ये यापूर्वी शिक्षण घेतलेल्या कोणत्याही माजी विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचंही इमॅन्युएल यांनी सांगितलं.भारत आणि फ्रान्सला एकत्रित पुढे जायचं आहे. दोन्ही देशांमधील तरुणांच्या मदतीनेच हे शक्य होणार आहे. समन्वय, विश्वास आणि मैत्रीच्या माध्यमातून आपण हे करु शकतो, असंही ते म्हणाले.