सुळकूड पाणी योजनेबाबत १६ जानेवारीला होणार बैठक……

सुळकूड पाणी योजनेसंदर्भात १६ जानेवारीला मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

इचलकरंजी-सुळकूड पाणी योजना कृती समिती पाटील यांना काळे झेंडे दाखविणार होते. मात्र, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि पोलिसांनी शिष्टाई केली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

मंत्री पाटील यांनी टेक्स्पोजर २०२४ ला भेट देण्यासाठी पंचरत्न मंगल कार्यालयात आले असता त्यावेळी त्यांनी कृती समितीशी चर्चा केली.

शहराला सुळकूड पाणी योजना मंजूर झाली आहे. त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, दुधगंगा नदीकाठच्या नागरिकांनी याला विरोध केला आहे. तसेच त्या भागातील नेत्यांचाही विरोध आहे. अनेकवेळा राज्य सरकारने बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पाळले नाही.

त्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील हे इचलकरंजीत येणार असल्याचे कळाल्यानंतर कृती समितीने काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, पोलिस प्रशासन, माजी आमदार हाळवणकर यांच्या मदतीने पाटील यांच्यासोबत कृती समितीस चर्चेला बोलावून निवेदन स्वीकारले आणि कागल परिसरातील मंत्री यांच्यासोबत येत्या आठ दिवसांत फडणवीस यांच्या दालनात बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्ते शांत झाले.

यावेळी आमदार प्रकाश आवाडे, अभिजित पटवा, विजय जगताप, रसूल नवाब, सुनील बारवाडे, कौशिक मराठे, नागेश शेजाळे, उमेश पाटील, विद्यासागर चराटे, आदी उपस्थित होते.