सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राची फेरचौकशी करण्यासाठी सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ३ महिन्यांच्या मुदतवाढीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती सामोर आली आहे.
या प्रकरणी यापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेली मुदत ५ जानेवारीला संपल्याने समितीने मुदत वाढीसाठी न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीवेळी (loksabha election) खासदार डॉ. महास्वामी यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र दाखल केल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीकडे दाखल केली होती.समितीचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव सूळ यांनी या प्रकरणात दक्षता पथक नेमून दोन्ही बाजूंची सुनावणी घेतली. दक्षता पथकाचा अहवाल आणि उपलब्ध कागदपत्रांनुसार खासदारांकडील जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता.
त्यावेळी आपल्याला पुरेशी कागदपत्रे सादर करण्यास आणि म्हणणे मांडण्यास समितीकडून पुरेसा वेळ दिला नसल्याप्रकरणी खासदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणाची सहा महिन्यांत फेर चौकशी करून निर्णय घ्यावा आणि त्याचा अहवाल न्यायालयास सादर करावा असे आदेश दिले होते.
