गडहिंग्लजमध्ये जनता दलाला मोठा हादरा……

गडहिंग्लज येथील जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील या तिघांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.यामुळे शहरातील जनता दलाला मोठा हादरा बसला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये आज (ता. १०) हा प्रवेश होणार असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, शहरातील विनोद बिलावर, अॅड. सतीश इटी यांच्यासह करंबळीचे भाजप सरपंच अनुप पाटील यांचाही प्रवेश असल्याचे श्री. खणगावे यांनी सांगितले. गेल्या वेळच्या सभागृहात स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल पालिकेत सत्तेवर होते. सभागृहाची मुदत संपण्यापूर्वीपासून या पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू होती. अनेक वेळा त्यात दुरुस्तीचा प्रयत्नही झाला. परंतु त्यात यश आले नाही.

सभागृहाची मुदत संपल्यानंतरही दोन वर्षाच्या कालावधीत खणगावे मनापासून पक्षात कार्यरत नव्हते. दरम्यान, या कालावधीत खणगावे यांच्यासह पाटील यांचीही राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीकता वाढत होती. गोडसाखर निवडणुकीत उदय पाटील यांनी तर उघडपणे मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा प्रचार केला होता.

मित्रत्वाच्या नात्याने भद्रापूर यांची खासदार संजय मंडलिक यांच्याशी जवळीकता पूर्वीपासूनच आहे.सहा महिन्यांपासून या तिघांचाही राष्ट्रवादी प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. श्री. मुश्रीफ यांचा फोन येताच मंगळवारी (ता. ९) सायंकाळी मुंबईकडे रवाना झाल्याचे श्री. भद्रापूर यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करणार असल्याचेही ते म्हणाले. स्थानिक पातळीवर इतर राजकीय पक्षांमध्ये कितीही उलथापालथ झाली तरी जनता दलातील एकजूट मात्र प्रत्येकवेळी जमेची बाजू ठरली आहे.