सोलापूर जिल्ह्यातील २३ लाख ४७ हजार ५५५ व्यक्ती केंद्र व राज्य सरकारच्या आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचारासाठी पात्र ठरले आहेत. पण, त्या प्रत्येकांनी ऑनलाइन सुविधा केंद्रांवरून आयुष्यमान कार्ड काढणे जरुरी आहे.
कार्ड काढलेल्यांना आजारी पडल्यानंतर दवाखान्याचा खर्च देण्यासाठी शेती, जागा, घर विकण्याची किंवा खासगी सावकाराकडून जादा व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ येणार नाही.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आणि महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आता एकत्रित करण्यात आली आहे. योजनेसाठी पात्र लाभार्थींना शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयांमधून तब्बल एक हजार ३५६ आजारांवर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.सोलापूर जिल्ह्यात सध्या योजनेत ५१ रुग्णालये आहेत.
त्याठिकाणी उपचारासाठी कोणताही कागद द्यावी लागणार नाही, पण लाभार्थींकडे ‘आयुष्यमान’चे कार्ड आवश्यक राहील. २०११ मधील सर्व्हेचा आधार घेऊन केंद्र सरकारने लाभार्थींची यादी प्रत्येक जिल्ह्याला पाठविली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील २३ लाखांवर लाभार्थी असून अद्याप साडेबारा लाख लाभार्थींनी कार्ड काढून घेतलेले नाही.
भविष्यात कार्ड नसलेल्यांना मोफत उपचारासाठी अडचण येवू शकते, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थीने आपले सरकार सुविधा केंद्र किंवा इतर ऑनलाइन सुविधा केंद्रावरून कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.