पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सांगोला पोलिस ठाणे परिसरासह मैदानी भागात २५० विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात वड, पिंपळ, पेरू, मोसंबी आदी प्रकारची झाडे लावण्यात आली.
पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात सांगोला पोलिस स्थानकातील सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हेड कॉन्स्टेबल तसेच इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. रोपांची नियमित देखभाल करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले. या उपक्रमामुळे पोलिस दलाकडून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून देण्यात आले आहे.
सांगोला पोलिसांकडून २५० वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
