आता मिसकॉलशिवाय गॅस सिलिंडरचे होणार नाही बुकिंग

गॅस सिलिंडर हा गृहिणीचा दैनंदिन गरजेचा महत्वाचा भाग आहे. मिसकॉलशिवाय आता घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग होणार नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता दोन दिवसांतच ऑईल कंपन्यांनी काढलेल्या या फतव्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे.
पूर्वी ग्राहकांना गॅस सिलिंडर बुकिंग केल्यानंतर २१ दिवसांनंतर मिळत होता. यासाठी गॅस एजन्सीमध्ये प्रत्यक्ष जाऊन अथवा फोनवरून बुकिंग घेतले जायचे. कालांतराने २१ दिवसांची अट रद्द करण्यात आली. ग्राहकांना गरजेनुसार तत्काळ गॅस सिलिंडर उपलब्ध होत होते. दोन दिवसांपूर्वी एका कंपनीने मिसकॉल दिल्याशिवाय गॅस सिलिंडर बुक होणार नसल्याचे सांगितले.
ग्राहक गॅस सिलिंडरच्या बुकिंगला गेल्यानंतर ही माहिती दिली जात होती.

अनेक ग्राहकांकडे कोणता नंबर गॅस बुकिंगला रजिस्टर केला हेच आठवत नव्हते. दुसऱ्या क्रमांकावर बुकिंग होत नसल्याने सिलिंडर संपलेल्या ग्राहकांना अडचण झाली. ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्याने नोंदणीकृत मोबाईलला मिस कॉल द्यायचा कसा, असा प्रश्न आहे. मिसकॉल सुविधा चांगली की वाईट यापेक्षा ग्राहकांसाठी ती कितपत सोयीची याचा विचार कंपन्यांनी करण्याची गरज आहे.