सांगली लोकसभा मतदारसंघात गत निवडणुकीत झालेली तिरंगी लढत भाजपच्या फायद्याची ठरली होती. आता पुन्हाही हाच खेळ होतो की काय अशी परिस्थिती निर्माण होत असून भाजप अंतर्गत असलेल्या नाराजीचा फायदा काँग्रेस कसा मिळवणार हाच यावेळच्या निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा आहे.
भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आणि दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी निवडणूक तयारी सुरू केली असली तरी भाजप अंतर्गत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही पहिल्यांदा उमेदवारीसाठी पक्षाअंतर्गत संघर्ष करीत मैदानात उतरण्याची तयारी ठेवली आहे.पलूस-कडेगाव, मिरज आणि सांगली.
यापैकी सांगली व मिरजेचे प्रतिनिधित्व भाजपकडे तर पलूस-कडेगाव आणि जतचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आणि खासदारचा गड मानला जाणारा तासगाव राष्ट्रवादीकडे अशी स्थिती आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडे खानापूर-आटपाडीचा मतदारसंघ आहे.
यापैकी बर्याच ठिकाणी खासदार पाटील यांच्या विरोधात पक्षाअंतर्गत गटबाजी दिसून येत असून यापैकी जतचे माजी आमदार विलासराव जगताप, खानापूरचे अनिल बाबर यांनी तर उघड विद्यमान खासदारांच्या विरोधात भूमिका वेळोवेळी मांडली आहे, सांगली, मिरजेतील आमदारासोबत फारसे सख्यही नाही, शत्रूत्वही नाही अशी स्थिती आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो.
दुसर्या बाजूला माजी आमदार देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष असताना पक्ष विस्ताराबरोबरच पक्ष बांधणीसाठीही प्रयत्न केले असून त्या माध्यमातून त्यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. उमेदवारीची पक्षाअंतर्गत लढाईचा तिढा पक्ष कसा सोडविणार हाही भाजपच्यादृष्टीने महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.