अलीकडच्या काळात बदलत्या वातावरणामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली आहे. त्यामुळे समाजात अंगावर काढण्याचे प्रमाण मोठे आहे. अंगावर दुखणं काढू नका. आपल्या आरोग्य शिबिरात सर्वरोग तपासण्या करून उपचार घ्या. त्यानंतर काही शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, तर तशी व्यवस्था केलेली आहे, असा विश्वास माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
येडेमच्छिंद्र येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचेजन्मगाव येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून बापूंच्या स्मरणार्थ आयोजित मोफत सर्वरोग तपासणी व उपचार आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले. आ. पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त घरांपर्यंत जाऊन गरजू रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळवून द्यावा. प्रतीक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोग्य शिबिराचे उत्तम नियोजन केल्याबद्दल कौतुकही केले.