विनापरवाना घोडा गाडी शर्यतीचे आयोजन ; सहा जणांवर गुन्हा दाखल

अनेक भागात यात्रेनिमित्त तसेच अनके कार्यक्रमानिमित्त शर्यतींचे आयोजन केले जाते. अलीकडच्या काळात बैलगाडी शर्यत, घोडागाडी शर्यत तसेच रिक्षा पळविणे यांसारख्या स्पर्धा घेतल्या जातात. परंतु या स्पर्धा घेत असताना काही काटेकोर नियम देखील सरकार तर्फे घातले जातात. पण प्रत्येकजण या नियमांचे पालन करतोच असे नाही. नियमबाह्य देखील अनेकांकडून शर्यती घेतानाचे चित्र दिसते. वाळवा तालुक्यातील आष्टा, बावची येथे उरुसानिमित्त विनापरवाना, बेकायदेशीर घोडा गाडी शर्यतीचे आयोजन केल्या प्रकरणी बावची येथील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक दीपक पाटील यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार पृथ्वीराज मोहनराव माने, फत्तेसिंह बाबुराव माने, रणजित बाबुराव माने, अमित तानाजी माने, अविनाश माणिकराव माने व गणेश शंकर माने यांच्यावर आष्टा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

बावची येथील शिवाजी चौक येथून बाववी ते गोटखिंडी रोड या ठिकाणी सहाजणांनी संगनमताने विनापरवाना बेकायदेशीर घोडा गाडी शर्यतीचे आयोजन केले होते. चौकात मोठी गर्दी झाली होती. उरसानिमित्त पोलिसांची गाडी पेट्रोलिंग करीत असताना गर्दी दिसली. पोलिसांनी गर्दी पांगवली, वाहतूक सुरळीत केली. शर्यत भरवून प्राण्यांचा छळ केल्या प्रकरणी सहाजणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.