वाळवा येथील कोटभाग जैनमंदिर, वीरसेवादल, वीरमहिला मंडळ, धर्मसागर पाठशाळा आणि वीराचार्य झांजपथक यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या पंचकल्याणक महामहोत्सवाची मंगलमय वातावरणात रथयात्रेने सांगता झाली. गेले सात दिवस पहाटे पाच वाजल्यापासून कृष्णा नदीच्या तीरावर उभारलेल्या भव्य मंडपात मंत्रघोषात पूजेची सुरुवात होत होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अनेक जिल्ह्यांतील श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. सर्व गाव यानिमित्ताने एकत्र आले होते. दररोज मुनीश्री आणि महाराजांचे प्रवचन होत होते. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता केली जात होती. यासाठी शेकडो कार्यकर्ते राबत होते.
आ. जयंत पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव याठिकाणी भोजनाचा लाभ घेता नायकवडी, बझारच्या कार्यवाह नंदिनी नायकवडी आदींनी भेटी देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले. सात दिवस शेकडो ऊसतोडणी मजुरांनाही याठिकाणी जेवणाचा लाभ आला. अखेरच्या दिवशी भव्य रथयात्रा काढण्यात आली. महापूजेचे यजमान महावीर होरे व डॉ. वंदना होरे अग्रभागी हत्तीवर बसले होते. दोन हत्ती, घोडे व अनेक सुशोभित रथ आणि जैनबांधव सहभागी झाले होते. यजमान होरे यांना हत्तीवरून मिरवणुकीने सर्वांनी घरी पोहोचवून या पूजेची सांगता केली.