राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतरही पालकमंत्रीपदाचा पेच सुटलेला नव्हता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा नाराजीचा खेळ करत पालकमंत्रीपदातही बाजी मारली आहे. त्यामुळे शिंदे गटात पुन्हा एकदा सन्नाटा निर्माण झाला आहे. आज (4 ऑक्टोबर) 11 जिल्ह्यांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली. कोल्हापूरमध्ये शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. ती आता अर्थातच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आली आहे. त्यामुळे शिंदे गटाला कोल्हापूरचे पालकत्व सोडावं लागलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची चांगलीच चर्चा रंगली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार? या संदर्भात सातत्याने चर्चा होती. पालकमंत्रीपदाची जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे असूनही चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र, कोल्हापुरात 15 ऑगस्टला ध्वजारोहण थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच केल्याने एकप्रकारे कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावर दावा करत शिंदे गटाला इशारा दिला होता.
कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून स्वप्नपूर्ती
मुश्रीफ यांचे कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून स्वप्न पूर्ण झालं नव्हतं. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अहिल्यादेवी होळकर नगर जिल्ह्याची जबाबदारी त्यांना मिळाली होती, तर कोल्हापूरचं पालकत्व पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांच्या वाट्याला आल्यानंतर त्यांनी ते नंतर सतेज पाटील यांच्याकडे दिलं होतं. त्यामुळे हसन मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री असूनही कोल्हापूरचे पालकमंत्री होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता ही कसर आता भरून निघाल्याने त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे.
दीपक केसरकरांविरोधात भाजपची नाराजी
अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मातब्बर खाती आपल्या पदरात पाडून घेतली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रीपदाचाही पेच कायम होता. मावळते पालकमंत्री दीपक केसरकरांच्या कार्यशैलीवरून कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड नाराजी होती. मेन राजाराम स्थलांर, पुरावरून विधान, शेतकरी संघाची जागा ताब्यात घेण्यावरून त्यांच्यावर कोल्हापुरात टीकेची झोड उठली होती. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री अजित पवार गटाकडे येण्याचेच संकेत अजित पवार यांच्या ध्वजारोहणातून मिळाले होते. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिंदे गटाचे केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री असूनही त्यांच्या विरोधात भाजपने मोर्चा खोलला होता. हे पालकमंत्री नव्हे, तर पर्यटनमंत्री असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या नेमणुकीवरून भाजपने त्यांच्यावर थेट हल्लाबोल केला होती. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री बदलले जातील, असेच एकंदरीत चित्र होते.