महिलांसाठी सरकारची खास योजना!

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी, मुलांसाठी, शिक्षणासाठी गुंतवणूक करीतच असतात. घरातील महिला या घरखरचातून थोडेसे पैसे बचत करीतच असतात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून नवनवीन योजना राबवण्यात येतात. महिलांसाठी राबवण्यात आलेली अशीच एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र.महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक लहान बचत योजना आहे.

ही योजना फक्त महिला गुंतवणूकदारांसाठी आहे. २०२३ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२५ या दोन वर्षांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेवरील प्रमाणपत्रावर मिळणाऱ्या व्याजावर कर पात्र असेल. या व्याजावर तुम्हाला र भरावा लागले. ही योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत कोणतीही महिला स्वतः किंवा मुलीच्या वतीने पालक गुंतवणूक करु शकते. तसेच पतीदेखील पत्नीसाठी या योजनेत गुंतवणूक करु शकतात.

या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास महिलांना ७.५ टक्के वार्षिक व्याजदर मिळते.योजनेअंतर्गत महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावरील गुंतवणूकीला आयकर कायदा 80C अंतर्गत सूट देण्यात आली आहे. परंतु योजनेअंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कर भरावा लागेल. व्याजावर मिळणाऱ्या रक्कमेवर टीडीएस कापला जातो.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत २ वर्षांसाठी २ लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला मॅच्युरिटीनंतर २.३२ लाख रुपये मिळतील. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेअंतर्गत खाते उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. याशिवाय आधार कार्ड, पॅनकार्ड, चेकसोबत पे-इन-स्लिपदेखील द्यावी लागेल. ही योजना देशातील अनेक बँकामध्येदेखील उपलब्ध आहेत.

या योजनेअंतर्गत खातेधारकांचे खाते मृत्यूनंतर बंद केले जाऊ शकते. तसेच जर तुम्ही कोणतेही कारण नसताना हे खाते बंद करत असाल तर त्यावर दोन टक्के कमी व्याजदर म्हणजे ५.५ टक्के व्याज मिळेल.