टीम इंडिया 60 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे.  पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणे थांबत नाही, तोपर्यंत भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर खेळणार नाही, अशी भूमिका भारताकडून घेतली जाते. परंतु आता भारतीय डेव्हीस कप संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत सरकारने भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली आहे. तब्बल 60 वर्षानंतर भारतीय टीम पाकिस्तान दौरा करणार आहे. पाकिस्तान उच्चायुक्तांनी भारतीय डेव्हीस कप संघातील खेळाडू आणि इतर स्टाफसाठी व्हिसाही जारी केला आहे. आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान डेव्हिस कपमधील जागतिक ग्रुप-1 मधील सामने होणार आहेत. हे सामने 3 आणि 4 फेब्रवारी रोजी इस्लामाबादमध्ये होणार आहे.

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडेरताने डेव्हिड कप स्पर्धेचे सामने पाकिस्तानऐवजी तटस्थ देशांमध्ये ठेवण्याची मागणी केली होती. परंतु आयटीएफकडून भारताची मागणी अमान्य करण्यात आली. त्यामुळे अखिल भारतीय टेनिस संघाने भारत सरकारला आपल्या संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली. जर भारतीय संघाने पाकिस्तान दौरा केला नसता तर अंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ पाकिस्तानला वॉकओवर दिले असते.

भारतीय डेव्हिस कप टीमने यापूर्वी 1964 मध्ये पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी पाकिस्तानचा 4-0 असा पराभव भारतीय टीमने केला होता. त्यानंतर 2019 मध्ये दोन्ही संघातील डेव्हीस कपचे सामने कजाकिस्तानमध्ये स्थानांतरित करण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही देशांतील तणावपूर्ण संबंधामुळे सामने तटस्थ ठिकाणी घेण्याची मागणी भारतीय टेनिस महासंघाने केली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने भारतीय टेनिस संघाची मागणी मान्य केली होती. आता डेव्हिस कप स्पर्धेसाठी रविवारी भारतीय संघ पाकिस्तानात रवाना होणार आहे.