दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा करून त्याचा परतावा तरी दिला नाहीच परंतू आता मुद्दलही परत द्यायला टाळाटाळ करत असल्याने हुपरी (ता.हातकगणंगले) येथील राजेंद्र भिमराव नेर्लेकर याच्या शिवाजी चौकातील घरासमोर सुमारे तीसहून अधिक गुंतवणूकदारांनी रविवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले.त्यांनी जेवणाचे साहित्य, शेगडी सोबत नेली असून पैसे दिल्याशिवाय दारातून उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
उत्तूर (ता.आजरा) येथील देशभूषण देशमाने यांच्या ओळखीच्या माध्यमातून नेर्लेकर यांच्याकडे अनेकांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे देशमाने यांच्यासह इचलकरंजी, हातकणंगले, उत्तूर, गडहिंग्लज,राधानगरी, कागल, कोल्हापूर शहर, निपाणी येथील लोकांचा महिलांसह ठिय्या मारलेल्यांत समावेश आहे.
त्याने रिअल इस्टेट, क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करून वेगवेगळी आमिषे दाखवून लोकांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतल्याची लोकांची तक्रार आहे. हे सर्व सुशिक्षित लोक असून पैसे द्या नाहीतर आम्ही दारातून उठणार नाही असा निर्धार करूनच त्यांनी हा ठिय्या मारला आहे.
स्वत: नेर्लेकर घरी नाही. परंतू त्यांच्या पत्नीने चर्चेला बोलवले. त्यास लोकांनी नकार दिला. पैसे कधी देणार ते सांगा, आता कोणतेही चर्चा नाही की कुणाची मध्यस्थी नाही. आम्ही शांततेत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.