आमदार डॉ. अशोकराव माने यांनी हुपरी पोलिसांना धरले धारेवर, काटेकोर नियोजन करण्याच्या सक्त सूचना

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. अशोकराव माने यांना प्रचंड मताधिक्य मिळत आमदारपदी निवड झाली. त्यांनी आमदारपदी निवड झाल्यानंतर विकास कामांकडे पुरेपूर लक्ष दिलेले आहे. हुपरी येथे मंगळवारी वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले. यामध्ये मोटर सायकलला चारचाकी ने धडक दिली व यामध्ये कुमार कुलकर्णी गंभीर जखमी झाले. तसेच जवाहर कारखाना येथे चौपाटीसमोर दोन मोटरसायकल यांची धडक झाल्याने युवराज जाधव, ओंकार जाधव गंभीर जखमी झाले. तसेच एसटी चालकाचा अंबाबाई मंदिराच्या कमानीसमोर ताबा सुटल्याने मोटरसायकलला धडक दिली. यात एक महिला जागीच ठार झाली. म्हणजेच एकाच दिवशी या घडलेल्या घटनांमुळे हुपरीसह परिसरामध्ये पोलीस आणि नगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त झालेला होता.

हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे झालेल्या या तीन अपघातानंतर आमदार डॉ. अशोकराव माने यांनी पोलीस व नगरपालिकेची तात्काळ बैठक घेऊन प्रशासनाची झाडाझडती घेतली. आमदार अशोकराव माने यांनी दोन्ही प्रशासनाची संयुक्त बैठक लावून वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अतिक्रमणे हटवावे, मुख्य मार्गावर सीसीटीव्ही बसवावेत अशा सूचना केल्या. यासाठी नगरपालिका आणि पोलिसांनी काटेकोर नियोजन करावे अशा सूचना देखील या बैठकीमध्ये त्यांनी केल्या.