हुपरीतील अवैध मदरसाचे बांधकाम तात्काळ तोडण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

हुपरी येथील ग.नं. ८४४/अ/ १ मधील नपा मालमत्ता क्रं. ४४८९ मुस्लीम सुन्नत जमियतने अवैधपणे उभालेल्या मदरशाला मालकीहक्काची संबंधित कागदपत्रे विहित मुदतीत सादर न केल्याने या अवैध मदरसाचे बांधकाम तात्काळ तोडावे अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे नितीन काकडे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. हुपरी नगरपरिषदेने बांधकाम अनधिकृत असून ते काढून घ्यावे अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्याची अंतिम आदेश वजा नोटीस लागू केल्याने खळबळ उडाली असून आता पुढे काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या संदर्भात मालकी हक्काच्या संदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र मुस्लिम जमियतकडून कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर न करता जमियतने हा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि तसेच हे प्रकरण वक्फ बोर्डकडे सादर करण्यात आले. त्यामुळे मदरसाचे अतिक्रमण काढू नये असे निवेदन हुपरी नगरपरिषदेत दिले आहे. मात्र हिंदू राष्ट्र समन्वय समितीने वास्तविक या जागेच्या संदर्भात सध्या कोणताही दावा प्रलंबित नसून सदरचे अतिक्रमण निष्कासित करून भूमी खुली करण्याच्या संदर्भात न्यायालयाचा कोणताही मनाई आदेश नाही अथवा स्थगितीचा आदेशही नाही. त्यामुळे सदरच्या मदरसाचे अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्यात यावे अशी मागणी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे. सदर जमीन गायरान असल्याने शासकीय मालकीची आहे. या जागेवरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे आदेश अपर तहसील कार्यालयातून देण्यात आले आहेत. बांधकाम काढून न घेतल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील योग्य ती कारवाई केली जाईल अशी नोटीस अध्यक्ष सुन्नत जमियत हुपरी यांना बजावण्यात आली आहे.