बागणी (ता. वाळवा) येथील बागणी विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांनी सन २०२२-२३ या कालावधीत ३८ लाख ६० हजार ८३ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समाेर आला आहे.याबाबत लेखापरीक्षक सचिन अशोक पवार (रा. कारंदवाडी, ता. वाळवा) यांनी आष्टा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२3 अखेर घडला आहे.बागणी विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थेत गैरव्यवहार झाल्याबाबत सभासदांमध्ये जोरदार चर्चा होती.
याबाबत विविध आंदोलनेही झाली. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२४ या कार्यकाळात तत्कालीन अध्यक्ष रमेश बाबूराव पाटील (रा. बागणी), सचिव खंडेराव भीमराव सावंत (रा. आष्टा), संचालक मुरलीधर शंकर बामणे, कर्मचारी सतीश अशोक शेटे व रवींद्र नरहरी किट्टे (सर्व रा. बागणी) यांनी २०२२-२३ या कालावधीत उधार खत उचल, ट्रॅक्टर भाडे, पशुखाद्य खावटी कर्ज व पगार उचल, असे व्यवहार दाखवत एकूण ३८ लाख ६० हजार ८३ रुपयांचा अपहार केला.
प्राप्त अधिकाराचा दुरुपयोग करून संस्थेच्या सार्वजनिक निधीचा स्वतःच्या खासगी कामासाठी वापर करून संस्थेच्या सभासदांची फसवणूक व विश्वासघात केल्याची तक्रार सचिन पवार यांनी आष्टा पोलिसांत दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक जयदीप कळेकर करीत आहेत.