अजित पवार गटाची मोठी खेळी….

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले काही नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे याआधी अजित पवार गटाने माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे, तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा पक्षप्रवेश करुन शरद पवार गटाला झटका दिला होता. त्यानंतर आता पुन्हा जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक नगरसेवक अजित पवार गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी सोमवारी कोल्हापुरात सांगलीतील माजी महापौर आणि नगरसेवकांनी भेट घेतली. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक हणमंत पवार, विष्णु माने, गजानन मगदुम यांचा समावेश आहे. त्यांच्यासमवेत अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते. या नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने जयंत पाटील यांना अजित पवार गट दुसरा जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अजित पवार यांच्या 5 फेब्रुवारीच्या सांगली जिल्ह्यातील दौऱ्यात जयंत पाटील यांचे अनेक कट्टर समर्थक अजित पवार यांच्या गटात जाहीर प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरू झाली आहे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी कोल्हापुरात भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसल्याचे सर्वांनी सांगत सांगलीत राज्यस्तरीय खोखो स्पर्धेसाठी निमंत्रण देण्यासाठी आणि विकास कामासाठी भेटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीमध्ये अजितदादांच्या 5 फेब्रुवारीच्या सांगली दौऱ्यात अनेकांचा प्रवेश होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे.