क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी….

T20 विश्वचषक 2024 या वर्षी जून महिन्यात होणार आहे. आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते. हा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि यूएसए मध्ये आयोजित केला जाणार आहे.अमेरिकेत प्रथमच क्रिकेटची मोठी स्पर्धा खेळवली जाणार आहे.

दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या वर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 साठी तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. या तिकिटांचे बुकिंग 7 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

आयसीसी टी-२० विश्वचषक 1 ते 29 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. ग्रुप स्टेज, सुपर-8 आणि सेमीफायनलसाठी 2.60 लाखांहून अधिक तिकिटे जारी करण्यात आली आहेत. प्रत्येक तिकिटाची किंमत श्रेणीनुसार ठरविण्यात आली आहे. तुम्हालाही तिकीट बुक करायचे असल्यास, तुम्ही t20worldcup.com या वेबसाइटला भेट देऊन सहज तिकीट बुक करू शकता.

आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 या स्पर्धेसाठी 20 संघांची प्रत्येकी 5 च्या चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघाला अ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासह स्थान मिळाले आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे.

यानंतर संघाचा सामना 9 तारखेला पाकिस्तानशी, 12 तारखेला यूएसए आणि 15 तारखेला कॅनडाशी होणार आहे. या स्पर्धेत ग्रुप स्टेजनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 8 मध्ये पोहोचतील. येथून चार संघ उपांत्य फेरीत जाणार असून त्यानंतर अंतिम सामना होणार आहे.