इस्लामपूरात सर्व्हर बंदमुळे मिळेनात दाखले वारंवार हेलपाटे!

सध्या सगळीकडे कुणबी दाखले आणि त्याचे सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू आहे. इस्लामपूर येथील सेतू कार्यालयात सर्व्हर डाउनच्या नावाखाली दाखल्यांसाठी नागरिकांना चार-चार दिवस तहसील कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. दिवसभरात सातत्याने सर्व्हर ठप्प होत असल्याने कर्मचारी वर्गही हैराण झाला आहे. महसूल विभागातील विविध प्रकारचे ५०० हून अधिक प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्रे सेतू कार्यालयातून वितरित केली जातात. त्यातच आता कुणबी दाखले आणि त्याचे सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, सर्व्हर वेळोवेळी बंद पडत असल्याने नागरिकांना चकरा माराव्या लागत आहेत.
शासनाने दाखल्यांसाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे.

बहुतांशी कागदपत्रे ऑनलाइन मिळण्याची सुविधा केंद्रेही उपलब्ध आहेत; परंतु कोणतीही कागदपत्रे फाइल वजनदार झाल्याशिवाय मिळत नाहीत. तहसील कार्यालय परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सेतू कार्यालयात सर्व्हर डाउन होत असल्याने शासकीय कामात दिरंगाई होत आहे. सेतू कार्यालयात एखादा दाखला काढायचा झाला तर रजा टाकूनच अनेकांना यावे लागते. सकाळी अर्ज दिल्यानंतर दाखला मिळेपर्यंत सायंकाळ होते. पहिल्या दिवशी काम झाले नाही तर दुसऱ्या दिवशी हेलपाटा मारावा लागतो. स्वतःहून काम करताना अडचणी येतात. मात्र एजंटामार्फत गेल्यास तत्काळ काम होते असा अनेकांना अनुभव येतो.