माघ वारी पालखीचे पाच रिंगण सोहळे होणार सोलापूरसह जिल्ह्यात!

सध्या माघ वारीसाठी वारकऱ्याची गर्दी आपणाला पहायला मिळत आहे. पांडुरंगाचे दर्शन घेण्याची ओढ त्यांना लागलेली असते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील पंढरपूरकडे माघ वारीनिमित्ताने पायी चालत जाणाऱ्या सर्व दिंडीतील वारकरी भाविक एकत्रित करुन त्यांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान व रिंगण सोहळा सुरू करण्यात आल्याची माहिती ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी दिली.

अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोलापुरात गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी नॉर्थकोट प्रशाला मैदान, पार्क चौक, येथे दु. ४.३० वा. होणार आहे. तत्पूर्वी दुपारी तीन वा. श्री मार्कंडेय मंदिर, पंचकटा, येथे पालखी पूजन पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक, उपाध्यक्ष नागनाथ बाबर, सचिव गोपाळ कोंगारी यांच्या हस्ते होणार आहे.

कोषाध्यक्ष राकेश अन्नम, संपर्कप्रमुख शंकर भोसले यांच्या हस्ते अश्व पूजन करण्यात येणार आहे. पद्मशाली ज्ञाती संस्थेकडून सुरेश फलमारी यांच्याकडून मार्कंडेय मंदिर येथे उपस्थित सर्व विणेकरी महाराजांचा उपरणे देऊन सन्मान करण्यात येणार आहे. वारकरी परंपरेच्या नियमाप्रमाणे अभंग, भजन करून पालखी प्रस्थान होणार आहे. त्यानंतर हा पालखी सोहळा नॉर्थकोट प्रशाला मैदानात आल्यानंतर रिंगण सोहळा होणार आहे.