आटपाडी तालुक्यातील शेतकरी त्रस्त….

सध्या होत असलेला हवामानात बदल यामुळे शेतकर्यांचे आतोनात नुकसान तर होतच आहे. पावसाने दिलेली दांडी यामुळे शेतकरी खूपच हतबल झालेला आहे. त्यातच महागाईची भर यामुळे सर्वसामान्य जनता अगदी मेटाकुटीला आलेली आहे. आटपाडी तालुक्यात काही गावांत चाराटंचाई आहे. चाऱ्यासाठी उसाला वाढती मागणी आहे.

कडबा, उसाचे दर भडकले आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. करगणीसह खरसुंडी, नेलकरंजी, माडगुळे, शेटफळे, लेंगरेवाडी, तडवळे, बनपुरी या गावांसह तालुक्यात पशुपालन व दुग्धोत्पादन दुय्यम व्यवसाय आहे. या पार्श्वभूमीवर सात-आठ गावांत २० हजारापर्यंत पशुधन संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळी यांचा समावेश आहे. गतवर्षीच्या समाधानकारक व दमदार पावसामुळे शेतकऱ्याकडे ओला चारा मुबलक होता. यंदा हा चारा अल्प प्रमाणात शिल्लक आहे.

सध्या उपलब्धता कमी असल्याने व नैसर्गिक चारा नसल्याने तो विकत घ्यावा लागत आहे. पशुखाद्याचे दर अगोदरच भडकले आहेत त्यातच कडबा प्रती शेकडा २००० रुपये दर आहे. ऊस ३००० रुपये क्विंटल दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे आतापासूनच उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. आता ही स्थिती, तर उन्हाळ्यात काय होईल, याची चिंता सतावते आहे.