शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेते मंत्रीपदाची माळ गळ्यात कधी पडणार याची आस बाळगून बसले आहेत. मंत्रीमंडळ विस्तार झाला तरी कोणत्या नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. अशातच आता महाविकास आघाडीच्या एका नेत्याने मोठा दावा केला आहे. मंत्रीमंडळातल्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 9 मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची तयारी सुरू झाली असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाहीत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
हसन मुश्रिफांचा सरकारने तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. तसंच राज्यातल्या सरकारचा उल्लेख त्यांनी लुटारूंचं सरकार असा केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळ मुश्रीफ यांना एक मिनिटही मंत्रीमंडळात राहाण्याच अधिकार नाही. शेतकऱ्यांना फसवणारा मंत्री सरकारमध्ये कास राहू शकतो, त्यांची मंत्रिपदावरुन तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
नवाब मलिक अजित पवार गटात
दरम्यान, राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड पाहिला मिळतेय. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. निवडणूक आयोगाच्या सुनावणी अजित पवार गटाने आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे तो बेचाळीसावा आमदार कोण याचीच चर्चा सुरु झाली होती.. नवाब मलिक यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात सत्तेत असलेल्या अजित पवारांचा मोठा वाटा असल्याची चर्चाही आहे. कालच अजित पवार गटाच्या समीर भुजबळांनीही मलिकांची भेट घेतली होती.. तेव्हा ते बेचाळीसावे आमदार नवाब मलिक असल्याचीच चर्चा आहे.