‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’; सीमाभागात मराठी भाषिकांचा एल्गार

भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी बेळगाव आणि सीमाभागात काळा दिन पाळला जात आहे.

तसेच मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात धर्मवीर संभाजी उद्यानापासून फेरी काढण्यास सुरुवात झाली आहे, तसेच काळे झेंडे आणि काळे फलक घेऊन मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले आहेत. १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचना करताना बेळगावसह ८६५ गावे अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आली होती. त्याच्या विरोधात दरवर्षी मराठी भाषिक काळा दिन पाळून महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त करीत असतात.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सीमाभागातील अनेक मराठी भाषिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून काळा दिन गांभीर्याने पाळला आहे. तसेच संभाजी उद्यान येथून निघणाऱ्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मात्र, फेरीला परवानगी नसल्याचे कारण देत दरवर्षी मिरवणुकीच्या अग्रभागी असणाऱ्या रिक्षाला मिरवणुकीतून हटविण्यात आले असून फेरीच्या मार्गावर प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

परंतु बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त मराठी झालाच पाहिजे आदी घोषणा देत मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शहराच्या विविध भागात फिरून झाल्यानंतर मराठा मंदिर येथे फेरीची सांगता होणार आहे. त्यानंतर जाहीर सभा होणार आहे.