राधानगरी तालुक्यातील एका गावातील प्रेमीयुगुलाने शुक्रवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास पन्हाळगडचा जोडकिल्ला असलेल्या पावनगडाच्या तटावरून दरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तत्काळ मदत मिळाली. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पन्हाळा पोलिस व घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुण व २१ वर्षीय तरुणी हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.
यातूनच दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. ते पन्हाळ्यावर फिरण्यासाठी आले होते व पावनगडाच्या तटबंदीवर बोलत बसले होते. पावणेचार वाजण्याच्या सुमारास प्रथम तरुणीने तटावरून सुमारे वीस फूट खोल दरीत उडी मारली; तर प्रियकराने आपल्या मित्राला फोन करून आपण उडी मारत असल्याचे सांगितले व मित्र आलेले दिसताच त्यानेही दरीत उडी मारली.
ही घटना पावनगड येथील दर्ग्याच्या बंदोबस्तासाठी असलेल्या दिग्विजय पांडुरंग मर्दाने व संदीप आनंदा गुरव या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी पहिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींचे मित्र तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना दरीतून वर काढले. दोघेही बेशुद्धावस्थेत होते.
मर्दाने व गुरव यांच्याकडून माहिती मिळताच पन्हाळा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक भाऊसाहेब मलगुंडे, पोलिस नाईक जाधवर, सचिन पाटील, पोलिस कॉन्स्टेबल केर्लेकर, वायदंडे व गणेश पाटील घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी पन्हाळा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले व पुढील उपचारांकरिता कोल्हापूरला सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठविले.
मुख्यालयातून पावनगड येथील दर्ग्याच्या बंदोबस्तासाठी असलेल्या दिग्विजय मर्दाने व संदीप गुरव या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळेच दोन जखमींना तत्काळ उपचार मिळाले. या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची नोंद पन्हाळा पोलिसस्थानकात झाली आहे.