अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारापुढे शेतकरी हवालदील…

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सरकारने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पुराने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी अधिकारी बांधावर जात आहेत परंतु पिकांची पाहणी न करताच निकष लावले जात आहेत.पीक हिरवं हाय…चला पुढं,’ अशी वाक्ये येत आहेत. यावर शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विरोध केला आहे.महापुराने नदीकाठावरील शेती दहा ते बारा दिवस पाण्याखाली होती.

सद्य:स्थितीत पीक हिरवे दिसत असले तरी उन्हाच्या झळा जाणवू लागल्यानंतर पिकांची कुजण्याची प्रक्रीया सुरू होते. यामुळे कोणतेही नियम व अटी न लावता सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.जिल्ह्यातील ऊस, भात, सोयाबीन, भाजीपाला, आदी पिके दहा ते बारा दिवस पाण्याखाली राहिली. ओढ्यांना आलेल्या मोठ्या पाण्यात काठावरील पिके वाहून गेली. अशा नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा सुरू झाला आहे.नदीकाठावर अजून गुडघाभर चिखल असूनही त्यातून वाट काढत कर्मचारी बांधावर जाऊन पंचनामे करीत आहेत.

सोबत शेतकऱ्यांनाही घेतले जात आहे. काही कर्मचारी प्रामाणिकपणे पंचनाम्याची कार्यवाही करीत असले तरी काही जणांच्या कार्यवाहीमुळे साऱ्याच पंचनाम्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यासारखी परिस्थिती आहे.नदीकाठावरील हिरवे दिसत असलेले भात, ऊस पीक पाहून काही कर्मचारी ”पीक हिरवं हाय, पुढं चला” अशी भाषा वापरत असल्याने शेतकरी आक्षेप घेत आहेत. इतके दिवस पाण्याखाली राहिलेल्या पिकांवरील चिखलमाती भुरभुऱ्या पावसाने धुऊन गेली आहे. उंचीने कमी असलेल्या उसाच्या पोंग्यात चिखल जाऊन बसला आहे; परंतु ते पीक हिरवे दिसते म्हणून पंचनामा न करता पुढेच जाणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

मुळात पिकाच्या सुरळीत माती माती अडकली असेल तर त्याची वाढ खुंटते.पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची माहिती नसणे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त होत आहे. सोयाबीनमध्ये दहा-बारा दिवस पाणी थांबल्याने पिकांचे भवितव्य अंधारात असल्याचे शेतकऱ्यांना कळते. पण, ते पिकही हिरवे दिसत असल्याने पुढे-पुढे जाण्याची कर्मचाऱ्यांची घाई भरपाईपासून वंचित ठेवण्याचाच प्रकार म्हणावा लागेल.